औरंगाबाद : भाजपच्या नेत्यांनी कामच केले नाही असा आरोप करीत चंद्रकांत खैरे यांनी थेट भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यापर्यंत गाऱ्हाणे मांडले. मात्र खैरे यांची दखल कुणीही घेतली नाही. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल शिवसेनेच्याच आमदारांने खैरेंना पाडले, असे म्हणत हात वर केले आहे. याबाबत खैरे यांना विचारले असता, त्यांनी दादांना सगळी परिस्थिती माहीत आहे. ते योग्य कारवाई करतील, असे सांगत मंत्री पदांबाबत देवावर विश्वास असल्याचे खैरे म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत भाजपने युती धर्म पाळला नाही, असा आरोप करून शिवसेनेचे पराभूत उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी एकच खळबळ उडवून दिली होती. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आजारपणाच्या काळात सिग्मा हॉस्पिटल मधून सूत्रे हलवली, असा आरोपही खैरे यांनी माध्यमांसमोर केला होता. जर आपला पराभव झाला तर भाजपच जबाबदार असेल, असेही ते म्हणाले होते. मात्र त्यानंतर त्यांनी तलवाऱ म्यान केल्याचे दिसते. केंद्रात नरेंद्र मोदी यांचे पूर्ण बहुमताचे सरकार स्थानापन्न झाल्यानंतर घटक पक्षांना किंमतच उरली नाही. याचा फटका शिवसेनेलाही बसला असे बोलले जाते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही खैरेंच्या पराभवावर फारशी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. त्यामुळे आता खैरे काहीसे एकाकी पडल्याचे चित्र आहे.
दादांना सारे माहिती आहे : खैरे
दरम्यान, चंद्रकांत पाटलांनी औरंगाबादेत शिवसेनेच्या आमदारांमुळे खैरे यांचा पराभव झाला असे सांगत भाजपचा बचाव केला होता. याबाबत खैरे यांना विचारले असता त्यांनी चंद्रकांत दादांना सगळी परिस्थिती माहीती आहे. त्यांच्याकडे सर्व पुरावे दिलेले आहेत. दादा उघड बोलू शकत नाहीत, ते योग्य कारवाई करतील असा विश्वास खैरे यांनी सांजवार्ताशी बोलताना व्यक्त केला. मंत्रीबाबत बोलताना त्यांनी माझा देवावर विश्वास आहे, योग्य तो निर्णय पक्ष घेईल असे सांगत अधिक भाष्य करण्याचे टाळले.